ताकातला पालक
माझा ९०% स्वयंपाक व्हेगन असतो, जवळपास बराच महाराष्ट्रीयन स्वयंपाक तसा असतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. पण एखादे वेळी कढी खिचडी, एखादे वेळी दह्यातली कोशिंबीर केली जाते. भारतात असाल तर त्यात ताजे ताक आणि भाकरीबरोबर लोण्याचा गोळा हे जास्तीचे आले. तर आजची ताकातला पालक अशीच एक कधीतरी केली जाणारी non -vegan भाजी. मम्मी नेहेमी चाकवताची करते पण इथे ती भाजी कुठे मिळायला!!! मग आहेच पालक आपल्या हाताशी मग करा त्याचेच!
५-६ कप पालक (फक्त पाने आणि कोवळे दांडे)
३/४ कप दही
२ टेस्पून बेसन
१.५ टीस्पून गोडा मसाला
१. टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करा)
लहान एक तुकडा गूळ
२ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य - जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
२-३ कप पाणी लागेल तसे
३-४ पाकळ्या लसूण
२-३ लाल मिरच्या (कमी तिखट)
कृती -
दह्यात पाणी घालून घुसळून टाक करावे. त्यात बेसन कालवून गुठळ्या काढाव्यात.
पालक स्वच्छ धुवून चिरावा.
जाड बुडाच्या पातेल्यात १ टीस्पून तेल तेल तापवावे. त्यात पालक घालून नीट परतावा. थोडे मीठ घातले की भाजी खाली बसते आणि परतणे सोपे जाते.
थोडावेळ शिजले की त्यात तिखट, मीठ, गूळ, मसाला घालून नीट ढवळून घ्यावे.
आता त्यात तयार केलेले ताक + बेसन घालावे. सतत ढवळत राहावे नाहीतर टाक फ़ुटते.
पालक आणि बेसन व्यवस्थित शिजले पाहिजे. भाजी घट्ट होत असेल तर थोडे पाणी घालावे.
भाजी तयार होत आली की फोडणीच्या काढीत उरलेले तेल तापवून त्याची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. त्यात ठेचलेला लसूण, लाल मिरच्या घालून लसूण गुलबट रंगाचा होईपर्यंत ठेवावे.
फोडणी गरम असताना उकळत्या भाजीवर ओतवी व गॅस बंद करावा. तयार भाजी पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर गरम गरम खावी.
टीपा -
- यात १/४ कप शिजलेले शेंगदाणे पण मस्त लागतात.
- लाल तिखटाच्याऐवजी हिरवी मिरची वापरण्यास हरकत नाही.
- मला ही भाजी थोडी घट्टच आवडते पण तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करायला हरकत नाही.
छान! आता प्रिंट करून घेतो! :-)
ReplyDeleteहे डिझाईन आवडले ब्लॉगचे! शिंपल आणि छान!
ताकातला पालक आवडत नाही पण ब्लॉगचे नवे रूप आवडले सांगण्यासाठी ही कमेंट :)
ReplyDelete