शेवयाची खीर (Shevai kheer)

मी साधारण ७वी मधे असेपर्यंत परवीनमावशीच्या घरुन खीरखुर्मा आणि वेज बिर्याणीचा डबा प्रत्येक ईदच्या दिवशी घरी यायचा. शकीलमामा किंवा अजुन घरचे कोणीतरी पोचवुन जात असे. त्या आज्जी अगदी आठवणीने आमच्यासाठी हा खाउ पाठवत असत. त्यानंतर आम्ही लांब रहायला गेल्याने ते बंद झाले. पण नंतर कलमाडेकाका आणुन द्यायचे डबा. पण आज्जीच्या हातची चव ती वेगळीच! पुढे मग रझिया खीर नक्की आणुन द्यायची कारण मला तिच एक शेवयाची खीर आवडते म्हणुन! एकदा तिला विचारले की यात काय काय घालतात. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काही ल्क्शात नाही राहिल्या पण खजुर किंवा खारिक घालतात ते मात्र लक्षात राहीले चांगले. त्या खरीचे मी केलेले एक light version!

१ वाटी बारीक शेवया
२-३ चमचे तुप
१०-१२ बिया प्रत्येकी बदाम, पिस्ते, काजु, अक्रोड - एकत्र पूड करुन
३-४ वेलच्या, ५-६ केर काड्या, बारीक तुकडा जायफळ - एकत्र पूड करुन
५-६ मोठ्या खजुर (US मधे असाल तर Medjol प्रकारचे खजुर वापरा California नको)
४ कप दूध (मी १% मिल्क फ़ॅटवाले वापरते)
६-८ टेबल्स्पून साखर (आवडीप्रमाणे कमीजास्त करावी)

कृती - शेवया जर अख्या असतील तर चुरुन १ वाटी चुरा घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर तुप घालुनशेवया हलक्या गुलाबी रंगावर भाजुन घेउन बाजुला ठेवा. त्याच पातेल्यात दूध तापायला ठेवावे. त्यात खजुराच्या बिया काढुन गर घालावा. आता हे दूध व्यवस्थीत उकळुन घ्यावे. जरा थंड झाले की मग त्यातला खजुन मिक्सरमधे बारिक करुन त्या दुधात ती पेस्ट घालावी. ते दूध परत उकळायला ठेवावे. त्यात शेवया घालाव्यात आणि बारीक गॅसवर अर्धवट शिजु द्याव्यात. त्यात आता वेलचीची पूड, बदाम पिस्त्यांची पूड घालावी आणि १-२ उकळ्या आणाव्यात. शेवटी साखर घालुन एक उकळी आणुन गॅस बंद करावा. थंड करुन खायला द्यावे.

टीप - खीरचा दाटपणा आपल्या इच्छेनुसार कमीजास्त करता येतो त्यासाठी दुधाचे प्रमाण कमीजास्त करावे लागेल.

Comments

Popular Posts