साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi)

Here is English version of this recipe -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/03/sabudana-khichadi.html

साबुदाणा खिचडी ब-याच लोकाना प्रिय असते. मला मात्र त्याचे खूप कौतुक नव्हते. एकतर घरात रोजचा उपास कधी कोणाचा नसे आणि सगळ्यांच्या वेळा सांभाळत मम्मीला असले खास प्रकार करायला सुट्टीच्या दिवसाशिवाय कधी वेळ पण नसे. श्रावणातले सोमवार, महाशिवरात्र याच दिवशी घरी खिचडी असे. हे सगळे संपले हॉस्टेलला गेल्यावर. रात्री मेसमधे भाकरी आणि कसलातरी पाला पाण्यासारखी पातळ आमटी असले दिव्य जेवण असे. मला भाकरीचे वावडे नव्हते पण ती इतकी जाड असे की खायचा कंटाळा यायचा. मग थोडे दिवस आम्ही काहीतरी करुन नेले पण तेही जमण्यासारखे नव्हते. मग त्यावर काढलेला उपाय एकदम 'सॉलेट' होता. आम्ही ६-७ जणी एकत्र जेवत असु. एकेकीने एकेक दिवस वाटुन घेउन रात्री उपास मांडले होते. मग जिचा उपास असेल तिला भात/भाकरी खाऊ घालण्याची जबाबदारी उरलेल्या मुलींवर आणि आलेली खिचडी सगळ्याना वाटणे ही तिची जबाबदारी! असे एक वर्ष काढले.

पुढे उसगावात आल्यावर मग साबुदाण्याबद्दल बरेच काही ऐकले होते, अनुभवही बरेच घेतले. सबुदाणा चांगला आहे की नाही हे बघायचे असेल तर सधरण २ टेबल्स्पून साबुदाणा १५ मिनिटे १/२ कप पाण्यात भिजत ठेवावा. जर तो पाण्यात फुटला नाही तर साबुदाणा ठिक आहे असे समजावे.
Sabudana Khichadi

साबुदाणा भिजवायची क्रुती :

१ कप साबुदाणा एका पातेल्यात घेउन स्वचछ धुवावा. त्यात सबुदाणा बुडेल आणि वर एखादा इन्च पाणी राहील अस भिजवावा. बरोबर १५ मिनीटानी वरचे पाणी काढुन टाकावे आणि झाकण झाकुन रात्रभार साबुदाणा भिजत ठेवावा. सकाळी अगदी एखादा पाण्याचा हबका मारून हलक्या हाताने साबुदाणा मोकळा करावा.

२ कप वरील क्रुतीप्रमाणे भिजवलेला साबुदाणा
१/२ ते ३/४ कप दाण्याचे कूट
३-४ हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ, साखर
१/२ लिंबाचा रस
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून जिरे

कृती - मिरच्या धुवुन चिरुन घ्याव्यात. साखर, मीठ साबुदाण्यावर घालून नीट मिसळून घ्यावे. एका जाड बुडाच्या कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापले की गॅस बारीक करावा. तेलात जिरे आणी मिरची घालुन १-२ मिनीटे परतवे. त्यावर अर्ध साबुदाणा घालावा. त्यात दाण्याचे कूट घालून उरलेला साबुदाणा घालावा. गॅस थोडा मोठा करुन नीट परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतल्यावर झाकण झाकून एक वाफ आणावी. झाकण काढून खिचडी नीट परतून घ्यावी. वरून लिंबाचा रस घालून परत थोडे परतून गॅस बंद करावा. हवी असेल तर वरून कोथिंबीर घालून गरम गरम खावी.

टीप - १. खिचडीमधे बटाटे घालायचे असतील तर फोडी करून तेलात न घालता बटाता मोठा मोठा खिसावा. आणि साबुदाण्यावर दाण्यच्या कुटाबरोबर घालून परतावा. कमी तेलात बटाटा घातलेली खिचडी मस्त होते.
२. बरेचदा बटाट्याला पाणी खूप असते अशावेळी खिसलेला बटाटा पिळून घ्यावा.

साबुदाणा उपसाला चालतो का आणि कसा? याचे उत्तर माझ्याकडे नाही. साबुदाणा शाकाहारी आहे का? मी माझ्यापरीने माहीती मिळवायचा प्रयत्न केला. भारतात पदार्थ बनवले जातात त्यावर कोणाचाच कन्ट्रोल नसतो, त्यामुळे बरिचशी माहीती माहीती नसते. अशावेळी द्रुष्टीआड स्रुष्टी असे समजून खायचे किंवा सगळे घरी बनवून खायचे. एक मात्र खरे की साबुदाण्यात पौष्टीक असे काहिही नसते. पूर्णपणे स्टार्च पासुन बनवलेला हा पदार्थ आहे. तेव्हा खाताना जपून खावा.

Comments

  1. अरे वा! रोज एकीने उपवास मांडायची आयडीया भारी आहे! :D फारच स्मार्ट पोरी होतात की तुम्ही :p

    खिचडी पौष्टिक नाही, आणि पित्तकारक आहे म्हणून जपून खावी लागते खरी. पण nothing can beat गरम गरम साबुदाण्याची खिचडी. मी उपवास कधेच केले नाहीत, पण खिचडीची मधून मधून आठवण होते तेव्हा हमखास करते. दाण्याचा कूट तयार असेल तर फारसे कष्ट न घेता होणारा प्रकार आहे हा... :)

    ReplyDelete
  2. साबुदाण्याबद्द्ल एका डॉ.नी लिहीलेला लेख मी वाचला होता, फारसा आठवत नाही, पण शेवटी त्यांनी लिहीले होते की साबुदाणा कसा तयार करतात हे कळाले तर तुम्ही तो खाणार नाही.

    पण काही म्हणा दादरच्या प्रकाश मधला साबुदाणा वडा काय टॆस्टी असतो.

    आता तो खाणे होणार नाही.

    ReplyDelete
  3. Ha blog khupch mast aahe.fawalya welat me ha blog wachat basate n mg kay-kay kartana kuthali recipe karta yeil te tharwate.
    baki tumhi bhaari aahat.evdhe vegavegale padarth try karayla dandagi haus lagaate + other creative artwork aahech

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts