Basil Pesto Spread

मला पास्ता करायला खुपच आवडते. पास्ता सॉस म्हणजे नेहेमीचा मारीनारा, त्याबरोबरच बेक्ड टोमॅटो सॉस, रेड बेल पेपर्स सॉस आणि सगळ्यात महत्त्वाचा पेस्तो सॉस. मागे कधीतरी एकदा अमिचीज मधे पेस्तो रॅव्हिओली खाल्ली होती. तो सॉस प्रचंड आवडला. तेव्हा इंटरनेट म्हणजे डायलअप त्यात कुठल्या रेसिपीज शोधायच्या म्हणजे एक दिव्य असायचे. त्यातुनही त्यावेळचे सर्चइंजिन्स म्हणजे सगळाच उजेड! पुढे रेसिपी शोधली पण मग खरोखर असेच करतात का यावर बराच काथ्याकुट केला आणि एवढे सामान आणुन मग वाया गेले तर म्हणुन मग तो विचारही रद्दच केला. यथावकाश मग एन पी आरवर कुठल्यातरी एका शोमधे पेस्तो केलेला पाहिला आणि धाडसाने सगळे पदार्थ आणुन करुन पाहिला. हळूहळू त्यात बदल करत गेले आवडीप्रमाणे वेगवेगळे नट्स घालुन पाहिले. एकुण प्रकार करायला प्रचंड सोपा आणि त्यामानाने टिकावु आहे. मी आजकाल हे पेस्तो स्प्रेड घरात बनवुन ठेवते म्हणजे मग पट्कन ब्रेडला लावुन घेता येते.

असा केलेला पेस्तो, मी माझ्या मैत्रिणीला, वृषालीला नेउन दिला. तिच्या मुलीला, श्रेयुला (वय वर्षे ३+), असले काय काय खायला आवडते. तर मी गेल्य गेल्या तिच्याकडे 'भुक लागलीय' अशी भुणभुण चालुच होती. म्हणले हे खाणार का ग. तर म्हणे ते हिरवे आहे तिखट आहे (संदर्भ-आपली नेहेमीची हिरवी चटणी). मी म्हणले नाही ग तिखट. आवडले तर खा नाही खाल्ले तरी चालेल. तरी पोरगी हात लावायला तयार नाही. मग बळच एक घास घातला. तो खाल्ल्या खाल्ल्या एक्दम चेहेरा खुलला. मस्त आहे म्हणुन लग्गेच सांगितले. अख्खा स्लाईस अगदी आवडीने खाल्ला. मी घरी परत येताना अगदी मस्त मिठी मारुन मला म्हणते 'मिनुमावशी, मला चटणी आवडली'. त्याच आठवड्यात पुढचे ४ दिवस आईने विचारले आज ब्रेकफास्टला काय देऊ? लेकीचे उत्तर - 'मिनुमावशीची चटणी लावुन ब्रेड!' पाचव्या दिवशी आई म्हणाली संपली ग चटणी. तर म्हणे मिनुमावशीला आपण परत करायला सांगुयात! पोरगी तशी हुशार आहे ;)


Basil Pesto Spread



१ मोठी जुडी बेझिल
१/४ कप Rosted Pine Nuts*
१/४ कप ऑलिव ऑइल
२ पाकळ्या लसुण
१ टेबलस्पून बाल्सामिक व्हिनेगर**
चवीप्रमाणे मीठ, मिरी पावडर

कृती -

बेझिलची पाने काढुन धुवुन टिपुन घ्यावीत आणि १०-१५ मिनीटे एखाद्या कापडावर पसरून ठेवावीत. फूडप्रोसेसरच्या भांड्यात पाईननट्स घालून एकदा फिरवून जाडसर पूड करावी. त्यात तेल, मीठ, लसुणपाकळ्या, मिरीपावडर आणि बाल्सामीक व्हिनेगर घालून एकदा नीट फिरवून घ्यावे. आता त्यात बेझीलची निम्मी पाने घालुन बारिक करावे. उरलेली पाने घालुन एकदा फिरवावे. पेस्तोची कन्सिस्टंसी साधारण आपल्या हिरव्या चटणीसारखीच असते. चवीप्रमाणे गरज असेल तर जास्तीचे मीठ, काळीमिरी आणि बाल्सामिक घालुन नीट निसळावे. गरज असेल तर जास्तीचे तेल घालण्यास हरकत नाही. पेस्तो वापरण्यासाठी तयार झाला.

टीप -

१. यातच थोडे जास्तीचे तेल घालून पास्त्यासाठी वापरता येते.
२. ब्रेडला लावुन खाण्यासाठी जास्त तेलाची गरज नाही पण खुप तेलात घालुन एका डिशमधे ठेवले तर डिपिंग सॉस म्हणुन उपयोगी पडते.
३. *पाईनाट्स मिळत नसतील तर आक्रोड किंवा काजु वापरायला हरकत नाही.
४. **बाल्सामिक व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घालावा.


Comments

  1. Basil mhanaje tuLashichI pane kaa?
    Ani yat tikhat kaahich naahi kaa?

    ReplyDelete
  2. Ashwini, बेझिल म्हणजे खरेतर सब्जा. पण भारतात जो सब्जा मिळतो तो म्हणजे थाई बेझील. तुला थोडी तुळशीची पाने आणि थोडी सब्जाची पाने वापरून करता येईल. आणि हो यात मिरीपूड हेच तिखट त्याहून अधिक काही नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts