वांग्याची रस्सा भाजी (Eggplant Rassa Bhaji)

(Link to English Recipe)

कृष्णाकाठाला राहिल्यामुळे वांग्याचे बरेच प्रकार घरी केले जायचे. साधारण मार्चनंतर मंडईमधे खुप भाज्या मिळत नसत. वांगी मात्र मुबलक मिळत. प्रत्येकवेळी भरलेली वांगीच केली जात असे नाही ती कारण खुप मसालेदार होतात. डाळवांगे, वांग्याची रस्सा भाजी कधीतरी भरित. वांगीभात असे प्रकार बरेचदा अलटुन पालटुन करावे लागत. वेगवेगळ्या उसळी, यातली एखादी भाजी असेच बरेचद जेवण असे टोमॅटो वगैरे चांगले मिळाले की कोशिंबीर. आता परिस्थिती बरीच बदललेली आहे. कोबी, फ्लॉवर, मटार बरेच दिवस मिळतात असे ऐकुन आहे. कृष्णाकाठची गर्द जांभळी काटेदार वांगी म्हणजे अगदी स्वर्गसुखच :) कोल्हापुर सांगलीकडे हिरवी वांगी मिळतात त्याची पण चव चांगली असते. तशीच हिरवी वांगी खानदेशकडेपण मिळतात. पण जांभळ्या वांग्याचीच चव अप्रतीम असे माझे प्रामाणीक मत आहे! इथे देखील जापनीज वांगी मिळतात ती पण अशीच दिसायला एक्दम गर्द जांभळी पण गोल नसतात. लांबुडकी हिरव्या दांड्याची कमी काट्याची अशी ही वांगी पण चविला मस्त असतात. थाई प्रकारची पांढरी वांगीपण बरेचदाफार्मर्स मार्केटमधे दिसतात.

ही भाजी आहे माझ्या बागेत लावलेल्या वांग्यांची. जापनीज वांग्यांची ६ झाडे लावली आहेत. खुप वाढली नाहीत पण वांगी मात्र मिळतात. वांग्यांचा काढलेला फोटो चुकुन डिलीट केला गेला. पुढचा बहर आला की तेव्हा काढेन परत. आता वांगेपुराण बास करुन रेसिपी लिहीते -


Eggplant Rassa Bhaji


भारतातली वांगी असतील तर ४, जापनीज, चायनीज वांगी असतील तर २-३, इटालियन असतील तर मोठे १ पुरेल
१ मोठा कांदा
गोडा मसाला
लाल तिखट
धने जिरे पावडर १ टीस्पून (वेगवेगळी असेल तर प्रत्येकी १/२ टीस्पून)
चिंच गूळ आवडीप्रमाणे (खूप आवडत नसेल तर वगळावे)
एखादी लसणाची पाकळी (आवडत असेल तर जस्तीचे घालायला हरकत नाही)
१ टेबलस्पून खोबरे (ओले, सुके कोणतेही)
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
फोडणीचे साहित्य - २-३ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
थोडी चिरलेली कोथिंबीर

कृती-
वांगी धुवुन देठे काढुन साधारण १ इंच इतक्या आकाराच्या फोडी करुन पाण्यात टाकाव्यात. कांदा मध्यम चिरावा (खूप बारीक नको). चिंचेत गरम पाणी घालून कोळ करुन घ्यावा. लसुण, खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर एकत्र वाटुन घ्यावे (खलबत्यात घेतल्यास उत्तम पण मिक्सरवर केले तरी हरकत नाही). जाड बुडाच्या पातेल्यात तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी आणि त्यात कांदा परतावा. कांदा तांबुस लाल झाल्यावर त्यात वाटलेला लसुण-खोबर्‍यचा गोळा घालावा वरुन लगेच वांग्याच्या फोडी निथळून घालाव्यात. वांगी नीट परतावीत त्यावर लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, धने जिरे पावडर घालावे. नीट मिसळावे. १ कप पाणी घालावे. वरुन झाकण घालुन गॅस बारीक करुन वांगी नीट शिजु द्यावीत. वांगी शिजल्यावर चिंच, गूळ, दाण्याचे कुट, थोडी कोथंबीर घालुन एक उकळी आणावी.

टीप -
वांगी न खाणायांसाठी एखादा बटाटा घालायला हरकत नाही. भाजी थोडीशी रसदार असते. पण अगदी आमटीइतकी पातळ नसते. मी कांदा लसुण मसाला घालुन पण ही भाजी करते पण ती थोडी जास्त मसालेदार होते असे वाटते पण चालणार असेल तर घालायला हरकत नाही.

Comments

  1. I like your blog.I always visited your blog.

    ReplyDelete
  2. Wow Superr!! looks absolutely amazing.. beautiful pictures too.. �� thanks for sharing..

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts