गूळ पोळी

(Link to English Recipe)

गूळ पोळी म्हणजे रथसप्तमी असे आमच्या घरी समीकरण होते. कारण संक्रांतीच्या दिवशी तिळाची वाडी केलेली असे. सकाळी उठुन दुध उतू घालवणे, सूर्याची पूजा करणे वगैरे झाले की मम्मीची स्वयंपाकघरातील गडबड सुरु व्हायची. रथसप्तमीला सुट्टी नसायची त्यामुळे शाळेत-कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी पूर्ण स्वयंपाक तयार व्हायचा. तसेच त्यादिवशी संक्रांतीच्या हळद-कुंकवाचा शेवटचा दिवस त्यामुळे तिला बरेचदा कुठेतरी लांब जायचे असे. त्यापूर्वी शिकवण्या, शिवण क्लासेस आणि शिवायला आलेले कपडे पूर्ण करणे असा भरगच्च दिवस तिच्यासमोर असे. पण तरी गुळपोळी ती आवर्जून करायची, अजूनही करते. यावर्षी मी ठरवून गुळपोळ्या केल्या पण संक्रांतीला केल्या कारण मला आदल्यादिवशी तयारीला थोडा वेळ मिळाला. ही पोळी करायला पुरणपोळीपेक्षा सोपी आहे. तयारी पण आधी करता येते.

Gul Poli

सारण -
१ कप मऊ गूळ
१/४ कप बेसन
१/४ कप तीळ
२ टेस्पून खसखस
३-४ टेस्पून तेल
४-५ वेलच्यांची पूड
चिमुटभर जायफळ पूड

वरील पारीसाठी -
१ १/४ कप गव्हाचे पीठ
१/४ कप रवा
१/२ टीस्पून मीठ
२ टेस्पून तेल

पाणी लागेल तसे.

कृती -
सारण -
गूळ खिसुन घ्यावा म्हणजे त्यात खडे रहाणार नाहीत. किंवा फूड प्रोसेसरला 'S' आकाराचे ब्लेड लावून बारीक करून घ्यावा. गूळ कोरडा/कठीण असेल तर एखादा चमचा तेल घालावे. असे केल्याने गूळ मऊ होतो.
बेसन २ टेबल्स्पून तेलात खरपूस भाजून बाजूला ठेवावे.
तीळ आणि खसखस वेगवेगळे कोरडेच गुलबट रंगावर भाजून ठेवावे. एकत्र करून ठेवून नये.
खसखस आणि तिळाची वेगवेगळी पूड करून घ्यावी.
आता गार झालेले बेसन, तिळकूट, खसखशीचे कूट, वेलची-जायफळ पूड असे सगळे एकत्र गुळात मिसळावे. फूड प्रोसेसरमध्ये असेल तर काम पटकन होते. नसेल तर हाताने सगळे एकजीव करावे.
गूळ कोरडा असेल तर सारण भुरभुरीत होते. मऊ असेल तर मात्र नीट गोळा होतो. सारण भुरभुरीत झाले तर अगदी एखादा थेंब पाणी घेऊन गोळा करावा. अशाप्रकारे सगळ्या सारणाचे एकसारखे १२ गोळे करावे.
हे सारण महिनो-महिने फ्रीजशिवाय टिकते.

पारी - 
पीठ, रवा आणि मीठ एकत्र करून मिसळावे.
तेलाचे कढत मोहन करून घ्यावे. ते पिठात मिसळावे.
पाण्याने कणिक मळून घ्यावी. कणिक चपातीच्या कणकेहुन थोडी घट्ट पण पुरीच्या पिठापेक्षा थोडी मऊ असते.
तयार पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवावे.
अर्ध्या तासाने पिठाचे १२ समान गोळे करून घ्यावेत.
तवा मध्यम आचेवर तापायला ठेवावा.
कोरडे पीठ लावून एका गोळ्याची वाटी करून घ्यावी. त्यात सारणाचा एका गोळा ठेवावा. सारणाचा गोळा हलक्या हाताने तिथल्या तिथे राहेल असा मोकळा करावा. पारीची कणिक व्यवस्थितपणे वर घेऊन गोळा बंद करावा.
कोरड्या पिठावर पोळी लाटावी. लाटताना पोळी उलटू नये, सावकाशीने लाटली तर कडेपर्यंत सारण व्यवस्थित पसरते.
गरम तव्यावर दोन्हीकडून भाजून घ्यावी.
अशा सगळ्या पोळ्या करून घ्याव्यात. गरम पोळ्या एकावर एक ठेवू नयेत, सुट्ट्या ठेवाव्यात.
गरम किंवा गार कशाही छानच लागतात.

टीपा - 
  1. पोळ्या लहान हव्या असतील तर १६-१७ होतील. 
  2. कडेपर्यंत  नीट सरण जात नाही/गेले नाही असे झाले तर, करंजीच्या कातनीने कड कापून घ्यावी. 
  3. पोळी खूप जाड ठेवू नये. पण अगदी पारदर्शक पातळ पण नसावी. पोळी पातळ झाली तर तव्याला सारण चिटकण्याची शक्यता असते. 




Comments

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts