बदाम कतली
अमेरिकेत बर्याच ग्रोसरी स्टोरमध्ये अलीकडे बदामाचे पीठ खूप सहज मिळते. ते मी एकदा उत्साहाने आणले आणि आता त्याचे काय करू म्हणुन ते फ्रीझरमध्ये २ महिने तसेच राहीले. मग एकदा आईच्या सल्ल्याने ते कणिक भिजवताना थोडे घालून वापरले तर त्या चपात्या मला फार आवडू लागल्या छान खुसखुशीत होतात. ती बदाम पिठाची पिशवी तशीच चपातीच्या कणकेत घालून संपवली. मी पूर्वी घरी काजू/पिस्ते/बदामाची पावडर करून कतली करायचे पण या पिठामुळे काम खूप सोपे झाले.
मी नेहेमी घरात बदाम्/पिस्ते/काजूची पावडर करून कतली करायचे पण ती बरेचदा रवाळ लागायची. मग एकदा धाडस करून ह्या पिठाची करून पाहिली आणि चक्क नीट जमली. आज परत केली तर ती पण नीट झाली. गेल्या ८ दिवसात साधारण १०-११ कप पिठाच्या वड्या केल्या म्हणून लिहून ठेवतेय!१/२ वाटी साखर (अमेरिकेत बारिक रवाळ साखर असते तरी खाली भारतात कशी करावी ते लिहिते)
३-४ टेबलस्पुन पाणी
१ ते १.५ कप बदामाचे पीठ
५-६ केशर काड्या किंवा थोडी वेलची पूड (वगळले तरी चालेल)
किंचीत बदामाचे तेल किंवा तेल
कृती -
सर्वात प्रथम एका जड थाळ्याला (मी कटींग बोर्ड किंवा पोळपाट वापरते) मागच्या बुडाच्या बाजुने तूप लावून घ्यावे. तसेच एका लाटण्याला आणि एका वाटीच्या बुडाला तेल/तूप लावून बाजुला ठेवावे.
बदामचे पीठ १ कप मोजून बाजुला ठेवावे. जास्तीचे हाताशी असू द्यावे.
आता कढईत साखर आणि ३ टेबलस्पून पाणी घेऊन पाक करायला ठेवावा. घालणार असाल तर केशराची पूड/वेलचीची पूड करून याच वेळी साखरेत घालायची.
आधी पाक खुपच पातळ वाटतो पण हो हळू हळू घट्ट होतो. पाकातला चमचा जरा उचलून वर धरुन पाक परत कढईत पडताना साधारण २ तार दिसतात तसे दिसले की पाक झाला असे समजायचे. फूड थर्मामिटर असेल तर नक्की वापरा टेम्परेचर २३५ फॅरेनहाईट असायला हवे.
त्यात पाव चमचा पाणी घालून नीट मिसळले की बदामाचे पीठ नीट मिसळायचे. दिसताना मिक्श्चर थोडे चिकट दिसेल ते तसेच हवे.
आता थाळ्यावर ते मिश्रण ओतायचे व वाटीने सारखे करायचे. लाटण्याने सरा सरा पातळसर लाटायचे. १/४ सेंटीमिटर जाडीची पोळी झाली की बोथट सुरी किंवा उलतण्याने कतल्या कापायच्या.
पूर्ण गार झाल्यावर डब्यात भरुन ठेवायच्या.
टीपा -
- लिहायला / वाचायला वेळ लागला तरी सुरुवात ते शेवट कृतीला कसेबसे १५ मिनीटे लागतात.
- बदामाचे पीठ नसेल तर काजू/बदामाची एकदम बारीक रव्यासारखी पावडर करून घ्यावी. त्यासाठी बदाम / काजू थोडे शेकून घेतले तर नीट बारीक पीठ
- भारतातली साखर मिक्सरला फिरवून घेऊन मग त्याचा पाक करायला घेतला तर कमी पाणी लागेल नाहीतर थोडे पाणी जास्तीचे घालावे लागेल.
- मिश्रण भगराळ/रवाळ झाले एकत्र येत नाही याचा अर्थ पाक जास्त झाला, मिश्रण कढईत घालून गरम असतानाच त्यात १/२ चमचा पाणी घातले तर ते मऊ होईल आणि लाटता येइल.
- मिश्रण खुपच चिकट झालेय याचा अर्थ पाक थोडा मऊ राहिला थोडावेळ गरम कढईत ठेवले तरी ते नीट होऊन लाटता येईल.
Comments
Post a Comment
Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.